प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे.
या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.
चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे.
यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरूवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करीत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याच्या नेमबाजीतील नैपुण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठबळ दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक करत म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे.
यासाठी या खेळाडुंचे, त्यांच्या प्रशिक्षक-मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबियांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी आणि मेहनती खेळाडुंच्या कामागिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडुंच्या चमूला शुभेच्छा दिल्या.