कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
सहा महिन्यांच्या बाळाला उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाचे आई-वडील गाढ झोपले असताना ही घटना घडली. मुलाच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा आढळल्या. अमेरिकेतील इंडियानामधील ही भयंकर घटना असल्याचं समोर आलं आहे.
मुलाच्या वडिलांनी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. त्यांना सांगण्यात आले की, 6 महिन्यांच्या मुलाच्या शरीरावर उंदराने चावा घेतल्याच्या गंभीर जखमा आहेत. यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली.
याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी मुलाचे वडील डेविड आणि आई एंजल स्कोनाबॉम यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत राहणाऱ्या मावशीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कपलला तीन मुलं आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांना एक 6 महिन्यांचा मुलगा रक्ताने माखलेला दिसला.
डोक्यावर आणि चेहऱ्यावर उंदराच्या चाव्याच्या 50 हून अधिक जखमा होत्या. पोलीस डिटेक्टिव्ह जोनाथन हेल्म यांनी मुलाच्या उजव्या हाताची चार बोटे आणि अंगठा गायब असल्याचे म्हटले आहे.
त्याच्या बोटांची हाडे दिसत होती. मुलाला रुग्णालयात नेले तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान लक्षणीयरीत्या कमी झाले होते. त्याला रक्त चढवावे लागले. मुलगा जिवंत आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मुलाचे घर कचरा आणि उंदराच्या विष्ठेने भरलेले होते. मार्च महिन्यापासून उंदरांमुळे त्रास होत असून त्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
मात्र या घरात उंदराने लहान मुलाला चावण्याची ही पहिलीच वेळ नसून सप्टेंबरमध्ये घरातील इतर मुलांनाही चावा घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर आले आहे.
घरातील दोन मुलांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांना 1 सप्टेंबर रोजी उंदरांनी त्यांच्या पायाची बोटे खाल्ल्याचं सांगितलं. त्यावेळी मुलं झोपली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.