आजरा : तालुक्यात चंदनाची झाडे तोडण्याची टोळी सक्रिय झाली आहे. मडिलगे व खेडे परिसरातील अंदाजे १०० ते १२५ झाडे चंदन चोरट्यांनी लंपास केली

0
57

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

आजरा : तालुक्यात चंदनाची झाडे तोडण्याची टोळी सक्रिय झाली आहे. मडिलगे व खेडे परिसरातील अंदाजे १०० ते १२५ झाडे चंदन चोरट्यांनी लंपास केली आहेत. बांधावर असलेली व गेल्या ५० वर्षांपासून सांभाळलेली चंदनाची झाडे रातोरात चोरली जात असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात चोरट्यांकडून दिवसा टेहळणी व रात्री झाडांची कत्तल केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मडिलगे, खेडे, हाजगोळी, भादवण परिसरांत शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. शेतकरी आपल्या पिकाप्रमाणे या चंदनाच्या झाडांचा सांभाळ करीत आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या काळात चोरट्यांकडून चंदनाच्या झाडावर धारदार ब्लेडद्वारे डल्ला मारला जात आहे.

काही शेतकऱ्यांच्या घराजवळील झाडेही चोरट्यांनी लंपास केली आहेत. चोरटे रात्री बारानंतर दिवसा टेहळणी केलेल्या झाडांवर ब्लेडच्या साहाय्याने डल्ला मारतात.

सुरुवातीला झाडांमध्ये केत आहे की नाही हे पाहिले जाते. केत नसलेली काही झाडे अर्धवट स्थितीत कापूनही चोरट्यांनी ठेवली आहेत.

झाडे तोडून घेऊन जाताना पिकांमध्ये धुडगूस घातला जात आहे. शेतकऱ्यांची दहा फुटांपासून वीस फुटांपर्यंत उंचीची चंदनाची झाडे लंपास केली जात असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. जंगली प्राण्यांच्या भीतीने शेतातील रात्रीची राखणदारी बंद झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चंदनाची झाडे तोडण्याची संधी शोधली आहे.

शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी पिकांबरोबर झाडांची ही रखवाली करण्यास सुरुवात करावी. सर्वांनी मिळून राखण केल्यास पिकांबरोबर चंदनाची झाडेही सुरक्षित राहतील. – विष्णू पाटील – शेतकरी खेडे, ता. आजरा.

चंदनाची झाडे तोडण्यास मनाई आहे. वनविभागाच्या परवानगीशिवाय अशी झाडे तोडल्यास व चोरटे सापडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. – स्मिता डाके – वनक्षेत्रपाल, आजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here