महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतची एक गोपीनीय बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा हे प्रकरण लांबणीवर गेलं आहे. याचे राजकीय पडसाद देखील कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ठाकरे गटाकडून वारंवार सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.
मात्र आता याप्रकरणी निकाल याच वर्षी लागणं कठीण असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अपात्रता प्रकरणी संभाव्य वेळापत्रकात कागद पत्रे तपासणी, साक्ष नोंदवणे व उलट तपासणीचा समावेश करण्यात आला आहे.
याप्रकरणाची एकूण ३४ याचिका आहेत. कागद पत्रे तपासणीचा समावेश करण्यात आल्याने या प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. त्यासाठी तीन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागू शकतो.यातच डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असणार आहे.
त्यावेळी याप्रकरणी सुनावणी होऊ शकते होऊन या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. मात्र कागद पत्रे पडताळणीचा यामध्यें समावेश करण्यात आल्यामुळे लवकर निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
त्यातच सुनावणीला तीन महिन्याचा वेळ लागला तर याचा निकाल यायला नवीन वर्ष उजाडणार आहे.आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी आज (२५ सप्टेंबर ) विधानसभेत पार पडली.
यामध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याची मागणी, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.