कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर/सडोली खालसा : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या नातेवाईकांकडून होणा-या छळाला कंटाळून अस्मिता केदारी चौगले (वय ३०, रा. कोथळी, ता. करवीर) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार रविवारी (दि. २४) रात्री उशिरा घडला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली.
मृत विवाहिता अस्मिता चौगले यांचे वडील दगडू सदाशिव यादव (वय ५५, रा. केकतवाडी, पो. शिरोली दुमाला, ता. करवीर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि केदारी यांचा १३ वर्षांपूर्वी विवाह झाला.
केदारी शेती करतात, तर अस्मिता गृहिणी होती. या दाम्पत्याला नऊ आणि आठ वर्षांच्या दोन मुली आहेत. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पती आणि सासू, सास-यांकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता.
या त्रासाला कंटाळून तिने रविवारी रात्री राहत्या घरात छताच्या फॅनला साडीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच पतीने गळफास सोडवून तिला सीपीआरमध्ये दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यादव यांच्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी पतीसह सासू आणि सास-यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.