कोल्हापूरात मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीचे विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

0
77

कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : पहिल्या विसर्जन मिरवणुकीचा मान असलेल्या तुकाराम पाटील गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची विधिवत पूजेनंतर विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ९ वाजता गणेश मूर्ती विसर्जनास सुरुवात झाली.

गणेशोत्सवादरम्यान गेले दहा दिवस कोल्हापूरातील वातावरण चैतन्य आणि उत्साहाने भारून गेले होते. शहरात विसर्जन मिरवणुकीची वेगळी परंपरा आहे. पहिल्या विसर्जन मिरवणुकीचा मान तुकाराम पाटील गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला असतो.

त्यांच्या विधिवत पूजेनंतर इतर अनेक मंडळे मुर्तीचे विसर्जन करतात. खासबाग मैदानात या गणेश विसर्जन मिरवणूकीस सकाळी नऊ वाजता मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्री’ चे पालखी पूजन आणि आरती झाली.

यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगर पालिकेचे प्रशासक डॉ. के. मंजूलक्ष्मी, उपयुक्त रवींद्र आडसूळ, शहर अभियंता हर्षाजित घाटगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने परिसर दणाणून सोडला.

फुलांनी सजविलेल्या पालखीचे मान्यवरांनी सारथ्य करत ती मिरजकर तिकटीपर्यंत वाहून नेली. यावेळी मिरजकर तिकटी येथे तुकाराम माळी तालीम मंडळाने देखाव्यात सादर केलेल्या मिरवणुकीस प्रारंभ झाला.

यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या सर्वच गणेश मूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्येच होणार आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. महापालिकेलाही सूचना देण्यात आल्या आहेत.

विसर्जन मार्गावर ६६ सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री १२ नंतर साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी असणार आहे.

हे आहेत आजचे मार्ग
विसर्जन मिरवणुकीचा मार्ग : उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई चौक, दिलबहार चौक, टेंबे रोड, खाँ साहेब पुतळा चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश चौक, रंकाळा स्टँड, जावळाचा गणपती चौक, राज कपूर पुतळा, इराणी खण.

समांतर मार्ग : उमा टाकीज चौक, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, गंगावेश, इराणी खण .

पर्यायी मार्ग : उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले रुग्णालय, यल्लमा मंदिर चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरा सागर हॉल, सुधाकर जोशी नगर चौक, देवकर पाणंद, क्रशर चौक, इराणी खण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here