प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
मान्सुन परतीचे पावसाचे वारे वाहत असताना, आता हवामान विभागाने येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आल आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. आज आणि उद्या समुद्र खवळलेला असल्याने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ
कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ होत आहे. त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून, पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु
दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. नैऋत्य मोसमी परतण्यास सुरु झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. नैऋत्य मान्सून राजस्थानातून माघारी फिरत असल्याची घोषणा यापूर्वीच हवामान विभागाने केली होती.
तसंच याआधीही हवामान विभागाने 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. नैऋत्य मान्सून सामान्यपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो.
गोवापासून कोकण किनारपट्टीच्या दिनेशे हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे.त्यामुळे कोकणात मासेमारी आणि पर्यटन ठप्प झालं आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. तर गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील प्रशासन अलर्ट मोडवर आहे.