कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ८९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शुक्रवारी (दि.६) नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यादिवसापासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईल.
दुसरीकडे आता गावागावातील राजकारणाला वेग येणार असून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
निवडणुक आयोगाने मंगळवारी सायंकाळी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक व ३०८० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींची सार्वतत्रिक, समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्याने आरक्षण निश्चित करुन दिलेल्या ४ अशा ८९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. तसेच जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमधील ६६ सदस्य व ६ सरपंच अशा ७२ पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
लोकसभा, विधानसभेइतकीच ग्रामपंचायत पातळीवरील निवडणूक ईर्ष्येची असते. मतदारसंघ लहान आणि लागून असतात. त्यात भाऊबंदकी, नात्यागोत्यातील पै पाहुणे एकमेकांविरोधात निवडणूक लढवत असल्याने ईर्ष्या मोठ्या प्रमाणात असते.
ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे अधिक वर्चस्व असते. पॅनेलद्वारे निवडणूक लढवली जाते. आपल्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी टोकाचे प्रयत्न केले जातात.
निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी आता कार्यक्रम जाहीर झाल्याने गावागावातील वातावरण आणि राजकारण तापणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
- नोटीस प्रसिद्धी : ६ ऑक्टोबर
- उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : १६ ते २० ऑक्टोबर
- छाननी : २३ ऑक्टोबर
- माघार, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप : २५ ऑक्टाेबर
- मतदान : ५ नोव्हेंबर
- मतमोजणी : ६ नोव्हेंबर
- अधिसुचना प्रसिद्धी : ९ नोव्हेंबर