ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात बारा पंचायत समित्यांच्या माध्यमातून विकासकामे राबवली

0
61

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

 जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत असणारी साडेबाराशे गावे, तेथील पाणी योजनेपासून ते शाळांपर्यंतची विकासकामे, रस्ते, गटारी करण्यापासून ते शेकडो कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी धडपडत आहेत.

परंतु अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंतची तब्बल २३८३ पदे रिक्त असल्याने या विकासाला वेग येण्यावरही मर्यादा येत आहेत. यामध्ये १३८९ प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा समावेश आहे.

ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात बारा पंचायत समित्यांच्या माध्यमातून विकासकामे राबवली जातात. प्रत्येक गावातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या सर्व व्यवस्थांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर येते.

अशातच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजना या शंभरच्यावर आहेत. अशातच दोन्ही शासनाकडून जाहीर होणारे महोत्सव, उत्सव, मोहिमा, अभियाने, रॅली, जगजागरण, स्वच्छता मोहिमा यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी पिचला आहे.

अशा परिस्थितीमध्ये इतक्या कमी मनुष्यबळामध्ये विविध विकासकामे राबवत कोल्हापूर जिल्हा परिषद राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. परंतु या रिक्त पदांचा ताण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येत आहे, हे वास्तव आहे.

त्यामुळे जरी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अनेक विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी दर शनिवारी जिल्हा परिषदेत कामात असलेले दिसतात. कारण, सुटीदिवशी बसल्यानंतरच विभागाच्या आवश्यक फाइल्सवर निर्णय घेता येतो. प्रलंबित कामे मार्गी लावता येतात, असा अनेक अधिकाऱ्यांचा अनुभव आहे.

रिक्त पदे अशी..

  • गट क्रमांक एकच्या अधिकाऱ्यांची पदे : ६०
  • गट क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांची पदे : ५४८
  • गट क्रमांक तीनच्या कर्मचाऱ्यांची पदे : १६४५
  • ड वर्गातील कर्मचाऱ्यांची पदे : १३०
  • अशी एकूण २३८३ पदे रिक्त

व्हीसीचा तगादा

कोरोनानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठका सुरू झाल्या आणि आता तर त्याचे प्रमाण खूपच वाढले वाढले. कोणत्या विभागाचा कोणता वरिष्ठ अधिकारी कधी व्हीसी लावेल आणि त्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर टाकेल, याची खात्री नसल्याने अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे नियोजनच करता येईना झाले आहे.

आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आणि दुसरीकडे विविध विभागांच्या वाढत्या तक्रारी यामुळे ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी वैतागले आहेत.

भरतीमुळे थोडा दिलासा

जिल्हा परिषदेतील ७२८ कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७ ऑक्टोबरपासून त्यासाठी परीक्षा सुरू होत आहेत. इतक्या जागा रिक्त असताना येत्या महिन्याभरात या जागा भरल्या गेल्या तर साहजिकच तो एक मोठा दिलासा ठरणार आहे.

‘आरोग्या’च्याच जागा रिक्त

माणसांच्या आणि जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डाॅक्टरांच्याच जागा अधिक संख्येने रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १५ जागा रिक्त असून, पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या तब्बल ५८ जागा रिक्त आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here