“सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल तर मुश्रीफांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा”

0
78

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्या ऑडिटरचा जामीन अर्ज नाकारताना त्यांच्यावर पीएमएलए कोर्टाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. वास्तविक पाहता या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे कोर्टाने अधोरेखित केले आहे.

या अनुषंगाने मंत्रिमंडळात मुश्रीफांना एक मिनिटसुद्धा ठेवू नये. सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुढच्या १०-१२ दिवसांत या मंत्रिमंडळातील नऊ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तरी त्यांना शुद्ध करून, त्यांच्यावर गौमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशिनमध्ये टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला.

पण हे दाग जरा जिद्दी आहेत, निघतच नाहीत अशी या मंत्र्याची स्थिती झाली आहे असं सांगत हे नऊ मंत्री कोण? असं पत्रकारांनी विचारले असता मी या नऊ मंत्र्यांची नावे सांगू शकत नाही पण मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील हे मी तुम्हला खात्रीपूर्वक सांगतो असा दावा त्यांनी केला.

तसेच या नेत्यांवर आम्ही आरोप केलेले नाहीत. या मंत्र्यांवर भाजप नेत्यांनीच लावलेले आरोप आहेत. त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं.

तर १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणारच. त्यांच्यावर कारवाई होणार म्हणूनच सुनावणीसाठी चालढकल केली जात आहे. कायद्याच्या चौकटीतून कोणीही त्यांना वाचवू शकणार नाही असं वडेट्टीवार यांनी सांगितले.

त्याचसोबत अजित पवार नेहमीच नाराज असतात त्त्यांची ती परंपरा आहे. नाराजीतून आपलं वर्चस्व दादा कायम ठेवतात. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातही त्यांनी तेच केलं. कधी नॉट रिचेबल, तर कधी त्यांना ताप यायचा त्यांना हा राजकीय आजार असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावला.

दरम्यान, बावनकुळे कधी अजितदादा मुख्यमंत्री म्हणतात तर कधी शिंदेच मुख्यमंत्री राहणार म्हणतात..कधी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणतात. त्यांच्याकडे आम्ही एक नावांची यादी देणार असून आलटून पालटून सगळ्यांचं नाव घ्या म्हणजे सगळ्यांचे समाधान होईल असा मिश्किल टोला वडेट्टीवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here