कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची भवानी मंडपातील अधिग्रहण केलेले दोन मजले दसऱ्यानंतर म्हणजे २४ ते २७ ऑक्टोबर या दरम्यान तातडीने परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहीती संघाचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी दिली.
अशा प्रकारे कोणाचीही जागा अधिग्रहण करता येत नसल्याचा निष्कर्षही न्यायालयाने नोंदवल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघाची भवानी मंडपातील इमारतीचे दोन मजले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत ताब्यात घेतले आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मंडप व इतर सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत.
मात्र, त्या कलमाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली, त्याविरोधात संघाच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा काढला होता.
त्याचबरोबर संघ व्यवस्थापनाने उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. त्यावर शनिवारी सुनावणी होऊन दसऱ्यानंतर म्हणजेच २७ ऑक्टोबरपर्यंत संघाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अशा प्रकारे कोणाचीही जागा अधिग्रहण करता येत नसल्याचेही न्यायालयाने सांगितल्याचे अध्यक्ष देसाई यांनी म्हटले आहे.
साखर, पेढे वाटून आनंदोत्सव
ज्या पध्दतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जागा ताब्यात घेतली, त्या प्रक्रियेला सभासद व कर्मचाऱ्यांचा आक्षेप होता. न्यायालयाने संघाची जागा परत करण्याचे आदेश दिल्यानंतर संघाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी भवानी मंडपात साखर व पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.