प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
मुंबई: शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? यावरून शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आल्याचं चित्र होतं. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हालाच मिळणार असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला होता.
मात्र आता शिवसेना दोन पाऊलं माघार घेतना दिसत आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. मात्र आता ठाकरे गटाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.
मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला सहानभुतीचे राजकरण करायचे नाही, आमचा दसरा मेळावा क्राॅस मैदान किंवा ओव्हल मैदानात होईल असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता शिवाजी मैदानावर ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान गेल्यावर्षी देखील दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचे हे दोन्ही गट आमने-सामने आले होते.
दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर दावा करण्यात आला होता. प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. अखेर शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा झाला. यंदा शिवाजी पार्क कोणाला मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं, मात्र आता हे मैदान दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटालाच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.