पन्हाळा प्रतिनिधी : माधुरी मस्कर
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात आणि गडहिंग्लज तालुक्यात दबदबा असणाऱ्या जनता दलाचे प्रमुख माजी आमदार श्रीपतराव दिनकरराव शिंदे ( वय ८७) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने पुण्यातील (Pune) रुबी हॉल रुग्णालयात निधन झाले. माजी आमदार शिंदे यांच्या जाण्याने जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात जनता दलाच्या माध्यमातून माजी शिंदे यांनी आपला राजकीय दबदबा कायम ठेवला होता.
ज्येष्ठ समाजवादी नेते, जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष आणि ‘गडहिंग्लज’चे माजी आमदार शिंदे (Sripatrao Dinkarrao Shinde) यांच्या पश्चात पत्नी उर्मिलादेवी, दोन मुली, चार भाऊ, बहिण, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एका महिन्यापूर्वी बाथरूममध्ये शिंदे पाय घसरून पडले होते. त्यामुळे त्यांच्या पायाला मोठी इजा झाली होती. त्यांच्यावर कराडच्या मध्ये रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, हृदयविकाराच्या तीव्र धक्याने रक्तदाब कमी होवून किडनीची क्रिया मंदावली. त्यामुळे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
सामान्य कुटुंबातून शिक्षक आणि वकिली
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वत:च्या घरात खाजगी शाळा चालवणारे दिनकरमास्तर यांचे पुत्र म्हणून शिंदे यांची ओळख होती. वडिलांनी दिलेले संस्कार आणि राष्ट्र सेवा दलाने दिलेल्या विचारात त्यांची जडणघडण झाली. त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून ही काम पाहिले होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाज हितासाठी लढा दिला होता.
शिंदे नेहमीच जनमानसात वावरतांना सामाजिक प्रश्नांच्या बाजूने उभे राहत. त्यांनी मोठी जनआंदोलने देखील उभारली होती. देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, विषमता निर्मूलन, पूरग्रस्त, धरणग्रस्त, अंगणवाडी सेविका, एस. टी., नगरपालिका व साखर कामगार, शेतकरी-शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आणिबाणीच्या काळात तब्बल दीड वर्षाचा तुरूंगवासही त्यांनी भोगला होता. गडहिंग्लज तालुक्याबरोबरच कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात शिंदे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. जनता दलाचा पाठिंबा कुणाला असणार यावर जिल्ह्यात चर्चा चांगलीच चर्चा रंगत होती.