कोकरूड -प्रतापराव शिंदे
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन आजपासून सुरू झाले आहे. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक व वन्यजीव च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा झाला. वारणावती येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तसेच सर्व अधिकारी उपस्थित कर्मचाऱ्यांनी यावेळी वृक्षारोपण केले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कमान तसेच येथील चेक नाक्याला सुशोभीकरण करून उत्साहात पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जंगल सफारी करून आणण्यात आली. पर्यटकांसाठी दोन मिनीबस या ठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहेत.
योग्य ते शुल्क आकारून पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद यावेळी घेता येणार आहे. चार महिन्यापासून बंद असणारे पर्यटन पुन्हा सुरू झाल्यामुळे निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या शुभारंभ कार्यक्रमास आ. मानसिंगराव नाईक, चांदोली विभागाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील, चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, माजी सभापती हणमंतराव पाटील, सरपंच शोभा माने, ज्ञानेश्वर राक्षे, काशी लिंग बादेरी, शिवाजी पाटील, के. पी. सावंत, विजय दाते, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, सतिश पाटील आदींसह चांदोली वन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.