नवऱ्याच्या मटक्याच्या व्यसनाला वैतागलेल्या बायकोने मटका अड्ड्यावर जाऊन नवऱ्याला चप्पलने झोडल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे. कळे (ता.पन्हाळा) येथे ही घटना घडली.
खाकीने हिरवा कंदील दाखवल्याने अवैध धंद्यांना ऊत आला. खुलेआम मटका, जुगार भर बाजारपेठेत फोफावला आहे.
चौकात, गल्लीत, बाजारपेठेत पडद्याच्या आडोशाला मटका खेळ सुरू आहे. बघता बघता लहान मुले, युवक, वृद्ध सगळेच याच्या आहारी गेले. कर्त्या-सवरत्या माणसांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.
मिळकत खेळात उडवल्याने घरात ठणठणाट होऊन भांडण-तंटे सुरू झाली आहेत. अड्ड्यावरून आपल्या मुलांना मारहाण करत घरापर्यंत नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, कळेतील एक अल्पभूधारक कुटुंब यात चांगलेच भरडले. शेतीतून उदरनिर्वाह होत नसल्याने संबंधित सेंटरिंग (बांधकाम) व्यावसायात हाताखाली जाऊ लागला.
उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न मिटल्यासारखे वाटू लागले तोवर मटका, जुगार जवळच सुरू झाल्याने त्याने चार महिने एक रुपयाही घरी दिला नाही. कुटुंबाची परवड झाली. संतापाने त्याच्या पत्नीने मटका अड्ड्यावर जावून नवऱ्याला चप्पलीने चांगलेच झोडपले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.