कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
एकतर्फी प्रेमातून युवकाने २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना वठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे उघडकीस आली. रविवारी संध्याकाळी पोत्यात गुंडाळलेला मृतदेह आढळला होता.
वडगाव पोलिसांनी अवघ्या चार तासांत याचा छडा लावत या खूनप्रकरणी सनी अरुण कांबळे (वय २५, सध्या रा. सम्राट अशोकनगर, वठार तर्फ वडगाव) याला अटक केली आहे.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खून झालेली तरुणी नांदेड जिल्ह्यातील होती. तिचे आई-वडील वाठार येथील वीटभट्टीवर कामास आहेत. संबंधित मुलगीदेखील एका फूटवेअरच्या दुकानात कामाला होती.
सामान्य व कष्टाळू कुटुंबातील या मुलीला सनी कांबळे हा दीड वर्षांपासून एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता.
याबाबत सनीला समजाविण्याचा प्रयत्न पीडित तरुणी व त्याच्या नातेवाईकांनी केला होता. दरम्यान, तरुणीसोबत सनीचा वाददेखील झाला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून मुलीस दत्त मंदिर रस्त्यावरील ओढ्याजवळील शेतात नेले.
तेथे यावेळी त्याने अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यास पीडितीने विरोध केला असता, तिचा विरोध मोडून त्याने लैंगिक अत्याचार करत तिचा खून केला. तरुणी मृत झाल्याचे कळताच त्याने पलायन केले. त्यानंतर तो काही झालेच नाही, अशा अविर्भावात निर्ढावलेला चेहरा करून गावात फिरत होता.
रविवारी रात्री अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांकडून वाठार व अंबप परिसरात बेपत्ता तरुणीचा शोध सुरू होता. यावेळी नांदेड जिल्ह्यातील काही कुटुंब वठार वीटभट्टीवर कामास आहेत.
येथील एक तरुणी सोमवारी (दि. ९) बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्यात येत होता, अशी माहिती मिळाली. तिच्याच शक्यतेने पोलिसांनी तपासावर लक्ष केंद्रित केले. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी कांबळे यांचे नाव निष्पन्न झाले. दरम्यान, सकाळी पोलिसांनी मृतदेहांची पडताळणी केली व काही तासांत संशयितास ताब्यात घेतले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके, पोलिस निरीक्षक भैरव तळेकर, पोलिस उपनिरीक्षक गिरीष शिंदे, अजित पाटील, प्रमोद चव्हाण, जितेंद्र पाटील, महेश गायकवाड, मिलिंद टेळी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संशयावरून सनी कांबळे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांने प्रेमातून पीडितेवर अमानुष व क्रूरपणे लैंगिक अत्याचार केले. तिचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात आले.
मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी पोलिस व वैद्यकीय पथकास आकाश अरुण दबडे, ओंकार करडे, उत्तम कोळी, अमित कोळी यांनी मदत केली. पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली. रात्री उशिरा कांबळे यास अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके अधिक तपास करीत आहेत.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
सनी कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. छान छौकीत राहून व्यसनासाठी पैसे उकळत होता. पीडिते बरोबरच्या ओळखीतून संबंध ठेवण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. यावर तिच्याशी भांडणदेखील झाले होते. परगावातील असल्यामुळे भीतीमुळे मृत मुलगी याबाबत फारशी बोलत नव्हती.
काही तासांत आरोपी निष्पन्न
काल रात्री प्राथमिक तपास पूर्ण करून संशयित निष्पन्न करण्यात आला होता. सकाळी घरच्यांनी कपड्यावरून पीडितेचा मृतदेह ओळखला होता. याबाबत निरीक्षक भैरव तळेकर, उपनिरीक्षक गिरीष शिंदे यांच्या टीमने आरोपी निष्पन्न केला होता.