नागपूर जिल्ह्यातील नरखेडमधून नजिकच्या वरूड तालुक्यातील गावे लक्ष्य करणाऱ्या एका २७ वर्षीय आंतरजिल्हा चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने २० ऑक्टोबर रोजी त्याला वरूड ते धनोडी मार्गावरून अटक केली.
महेश गजानन लोनारे (२७, रा जामगाव, ता. नरखेड जि. नागपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिणे, मोबाईल दुचाकी व रोख रक्कम असा एकूण १.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेंदुरजना घाट येथे मोहम्मद ईशाक यांच्या घरातून १८ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा माल चोरी गेला होता.
त्यानुसार, शेंदुरजना घाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना २० ऑक्टोबर रोजी महेश लोनारे, नामक इसम हा सोन्या चांदीचे दागिने घेवुन विक्रीकरीता वरूड ते धनोडी रोडवरील साईकृपा हॉटेलजवळ विचारपुस करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार एलसीबीने दुचाकीवरील महेश लोणारे यास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता त्याने उड़वाउडवीचे उत्तर दिली.
चोरीच्या गुन्हयांची कबुली
चाैकशीदरम्यान शेंदुरजनाघाट येथील एका घरात आणि बालासुंदरी देविच्या मंदिरात चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या अटकेमुळे वरूडमधील तीन व शेंदुरजनाघाट येथे नोंद असलेल्या एक असे चार गुन्हे उघड झाले.
चारही गुन्हे याच वर्षाचे आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात एलसीबीप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक नितीन चुलपार, शेख तस्लीम, मुलचंद भांबुरकर, एएसाआय संतोष मुदाने, बळवंत दाभणे, रविद्र चावणे, भुषण पेठे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पंकज फाटे, हर्षद घुसे, मंगेश मानमोठे यांनी ही कारवाई केली.