Navratri 2023: सातव्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईचा ‘नारायणी नमोस्तुते’ रूपात जयघोष, उद्या नगरप्रदक्षिणा

0
80

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या सातव्या माळेला शनिवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची ‘नारायणी नमोस्तुते’ या रूपामध्ये पूजा बांधण्यात आली. उद्या रविवारी (दि. २२) अष्टमीनिमित्त रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची नगरप्रदक्षिणा होणार आहे.

सर्व चराचर सृष्टी श्रीदेवी मातेच्या दिव्य तेजांशातून निर्माण झाली. अखिल ब्रह्मांडात मीच एकटी नित्य विद्यमान आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे कोण आहे, असे श्रीदेवीमाता म्हणते. यामुळे शुंभ-निशुंभ युद्धावेळी ब्रह्मादी देवतांची शक्तिस्वरूपे, श्रीदेवीमातेच्या साथीने, युद्धात असुरांशी लढण्यासाठी उतरल्या. देवीने शुंभ-निशुंभांचा वध केला व त्रैलोक्याला दुःख मुक्त केले.

श्रीदेवी महात्म्याचा (सप्तशती) अकरावा अध्याय ‘नारायणी स्तुती’ या नावाने ओळखला जातो. या अध्यायात श्रीदेवीची स्तुती करताना म्हणले आहे की, हे माते! हे सर्व विश्व तू एकटीनेच व्यापलेले आहेस. याच अध्यायात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐंद्री, चामुंडा या रूपात असणाऱ्या हे नारायणी! तुला नमस्कार असो, असे देवीचे स्तवन केले आहे.

विश्वातील वेगवेगळ्या शक्ती ही एका आदिशक्तीचीच विविध रूपे आहेत, हे दर्शवणारी सप्तमातृकाशक्ती श्रीदेवीमातेची ही महापूजा श्रीपूजक आशुतोष ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारलेली आहे. रविवारी अष्टमीनिमित्त रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची सजवलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here