कोल्हापूर : केडीसीए’चा खेळाडू अनिकेत नलवडे व श्रेयस चव्हाण यांची सुरत येथे २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या तेवीस वर्षाखालील राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली.
एकदिवशीय साखळी पध्दतीने होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह पंजाब, हिमाचल प्रदेश, पाॅडेचरी, केरळ, कर्नाटक, नागालॅड या संघात सामने होणार आहेत. अनिकेतने यापुर्वी विविध वयोगटात चमकदार कामगिरी केली आहे.
त्याने विजय मर्चंट स्पर्धेत चार सामन्यात १६० धावा व ९ बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे. सन २०१८-१९ या हंगामात त्याने कुचबिहार ट्राॅफी स्पर्धेत सहा सामन्यांत ४०० धावा व १२ बळी घेतले आहेत. सन २०२१-२२ या हंगामात २५ वर्षाखालील कर्नल सी.के.नायडू स्पर्धेत महाराष्ट्राचा उपकर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत त्याने २०२२-२३ या हंगामात ६२७ धावांचा पाऊस व नऊ बळी मिळवले आहेत.
श्रेयसनेही यापुर्वी २०२१-२२ या हंगामात १९ वर्षाखालील गटात कोल्हापूरकडून खेळताना ५ सामन्यांत तब्बल ४६ बळी घेतले आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याची विनू मंकड एकदिवशीय स्पर्धेसाठी राज्य संघात वर्णी लागली होती. या दोघांची एमसीएच्या प्रिमियर लीगसाठी संघात निवड झाली होती. सध्या दोघेही गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात सराव करीत आहेत.