काेल्हापूर : कोट्यवधींचा भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या तक्रारींमुळे बाळूमामा देवालयावर प्रशासकांची नियुक्ती होताच देवालयाच्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचे रजिस्टर, नोंदी व कागदपत्रे गायब झाली आहेत.
देवालयाला यापूर्वी कोणकोणत्या गटातून किती उत्पन्न मिळत होते याचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही; पण सध्या हाती येत असलेल्या आकडेवारीनुसार अंबाबाईसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट उत्पन्न बाळूमामा देवालयाचे आहे. देवस्थान समितीला वर्षाला १८ कोटी उत्पन्न मिळते. बाळूमामा देवालयाचे उत्पन्न २८ कोटी आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही देवस्थानापेक्षा बाळूमामा देवालयाचे उत्पन्न सर्वाधिक आहे. अंबाबाई मंदिर देवस्थानापेक्षा बाळूमामाचे देवस्थान जास्त श्रीमंत आहे; परंतु अंबाबाई देवस्थानच्या व्यवहारावर समाजाचे जास्त लक्ष आहे व त्याच्या नोंदीही आहेत.
बाळूमामा देवस्थान ग्रामीण भागात आडमार्गाला आहे व येणारा भक्तवर्ग सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील असल्याने तेथील व्यवहारांकडे त्यांचे चौकसपणे लक्ष नाही. त्यातही देवावरील श्रद्धेचा भाग मोठा आहे.
विविध घटकांच्या तक्रारीनंतर धर्मादाय उपायुक्तांनी कारभाराच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्यांच्या अहवालात भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ४१ ड अंतर्गत विश्वस्त मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती केली.
ही नियुक्ती होताच त्याच दिवशी ट्रस्टच्या कार्यालयातून सर्व कागदपत्रे, वेगवेगळ्या उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड गायब करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ट्रस्टमध्ये गेल्या २० वर्षांतील कारभाराची माहिती उपलब्ध नाही. याबाबत प्रशासकांनी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे.
- प्रशासक कालावधीतील उत्पन्न (११ एप्रिल ते २३ ऑगस्ट २०२३ )
- मंदिर दानपेटी : ३ कोटी ७३ लाख ४५ हजार १८३
- बकऱ्यातील दानपेटी : ७६ लाख ६३ हजार २८२
- पशुधन विक्री : १ कोटी ९७ लाख १९ हजार ३३०
- खोबरे व इतर : ३ कोटी ११ लाख ४६ हजार
नरतवडेत मंदिर का..?
बाळूमामांनी समाधी घेतली ते जागृत स्थान असताना तेथूनच पुढे असलेल्या नरतवडे (ता.राधानगरी) गावात कोट्यवधी खर्चून दिवंगत कार्याध्यक्षांनी बाळूमामांचे मंदिर उभारले.
हे म्हणजे मूळस्थानाचे महत्त्व कमी करण्यासारखे आहे. या मंदिरासाठी त्यांच्याकडे कोट्यवधींची रक्कम आली कोठून याची चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदारांनी धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे केली आहे.
सोने, चांदी गेले कुठे ?
दानपेटीत जमा होणाऱ्या सोने, चांदीच्या अलंकारांची नोंदवही नाही. सोने, चांदी परखून त्यांची किंमत निश्चितीची कार्यवाही न करता ते वितळवून ठेवले गेले. ते कुठे आहेत. इतक्या वर्षांमध्ये किती तोळे अलंकार ट्रस्टकडे आहे याची माहिती नाही.