गडचिरोली पोलिसांची शहीद सन्मान यात्रा कोल्हापुरात, दुचाकींवरून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण

0
65

कोल्हापूर : कायदा सुव्यवस्था राखताना शहीद झालेल्या पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच, दुर्गम भागातील पोलिसांच्या योगदानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून दरवर्षी शहीद सन्मान यात्रा काढली जाते.

दुचाकींवरून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी यात्रा कोल्हापुरात पोहोचली. गडचिरोली येथे शनिवारी (दि. ४) शहीद सन्मान यात्रेचा समारोप होणार आहे.

देशात दुर्गम ठिकाणी काम करणा-या पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबवावे लागतात. नक्षलवादी, दहशतवादी आणि समाजकंटकांचा सामना करताना अनेक पोलिस प्राणांची आहुती देतात.

शहीद पोलिसांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली पोलिस दलातील स्पेशल फोर्सचे किशोर खोब्रागडे, विनय सिद्धगू, राहुल जाधव, रोहित गोंगले, अजिंक्य तुरे आणि निखिल दुर्गे यांनी १० ऑक्टोबरला गडचिरोलीतून शहीद सन्मान यात्रेला सुरुवात केली.

तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यातील प्रवास पूर्ण करून यात्र कोल्हापुरात पोहोचली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सन्मान यात्रेचे स्वागत केले. पुढे सांगली, सोलापूर, लातूर, नांदेडमार्गे यात्रा शनिवारी गडचिरोली येथे पोहोचणार असल्याची माहिती किशोर खोब्रागडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here