पट्टणकोडोली : जग भारताकडे महासत्ता झालेला बघेल, देशात समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल, राजकारणात प्रचंड उलथापालथ होईल, बळीराजाला सुखाचे दिवस येतील, रोगराई सर्वसामान्य राहील, अशी भाकणूक फरांडेबाबांनी येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत केली.
‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात भंडारा, खोबरे व लोकरीची मुक्त उधळण, ढोल-कैताळाच्या निनादात विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला चैतन्यमय वातावरणात सुरुवात झाली.
मुख्य आकर्षण असणारी फरांडेबाबांची भाकणूक भक्तजनांच्या उपस्थितीत पार पडली.
येथील विठ्ठल बिरदेव यात्रेचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. या यात्रेला पशुहत्या होत नसल्याने इतर गावांपुढे हा आदर्श निर्माण झाला आहे. भाकणुकीपूर्वी गावचे पाटील व फरांडेबाबा यांची सुवर्णभेट झाली. देवाचे मानकरी प्रकाशकाका पाटील यांनी मानाच्या तलवारीचे पूजन गावचावडीत केले.
नंतर गावडे, मगदूम, जोशी, चव्हाण, चौगुले, देवस्थान कमिटीचे पंच, धनगर समाजबांधव तलाठी, सरपंच, उपसरपंच बाबांना भेटण्यासाठी निघाले. मानाच्या दगडी गादीवरून विराजमान झालेल्या फरांडेबाबांना देवळात येण्याचे आमंत्रण दिल्यानंतर दुपारी अडीच वाजता फरांडेबाबा, नाना देव महाराज वाघमोडे यांनी आमंत्रण स्वीकारून जागेवरून उठताच ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने परिसर दणाणून गेला. हळद-खोबरे यांची उधळण करण्यात आली. बाबा हेडा नृत्य करीत तलवारीने पोटावर वार करीत देवळात जाण्यासाठी निघाले.
यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हेडाम खेळत फरांडेबाबांनी देवळात जाऊन दर्शन घेतले व भाकणूक कथन केली. यावेळी ३० ते ४० टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
इंगळीचे चौगुले यांच्या मानाच्या उसाने भरलेल्या गाडीला लुटण्याचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. इथून पुढे तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत अनेक विधी, धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यात्रेत पाळणे, खेळणी, मिठाई, भांडी, घोंगडी, आइस्क्रीम खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात्रा कमिटी, पंच, समस्त धनगर समाज, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन यांच्याकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.