बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याने नुकताच त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर प्रचंड मोठी गर्दी केली होती.
परंतु, किंग खानची ही एक झलक पाहणं त्याच्या काही चाहत्यांना महागात पडलं आहे. कारण, उसळलेल्या गर्दीमधून त्याच्या १६ चाहत्यांचे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाली असून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे वांद्रे येथील बँड स्टँडवर असलेल्या शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करायला सुरुवात केली होती.
विशेष म्हणजे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील मन्नत बाहेरुन तब्बल १६ मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.
खास शाहरुखला भेटण्यासाठी कोल्हापूरवरुन आलेल्या आलोक कुमार या तरुणाचा फोन चोरीला गेला आहे. याप्रकरणी त्याने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. “मन्नतबाहेर उसळलेल्या गर्दीत माझा फोन चोरीला गेला.
मी रात्री १२.४५ वाजता या गर्दीतून बाहेर पडलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझा फोन गायब आहे. त्यानंतर मी लगेच पोलिसाकडे तक्रार दाखल केली”, असं आलोक कुमार म्हणाला.
दरम्यान, शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई-पुण्यासह नांदेड, सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक शहरातून मोठ्या संख्येने चाहते आले होते. मात्र, यावेळी त्यांना मोबाईल चोरीला गेल्यामुळे चांगलाच फटका बसला आहे.