भुईबावडा घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक तब्बल दोनशे फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रक चालक सतीश आनंदा महाजन (वय ४७) रा.मल्हारपेठ ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर हे जागीच ठार झाले आहेत.
क्लीनर असलेला त्यांचा मुलगा या अपघातातून दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे. हा अपघात गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चालक सतीश महाजन हे आपल्या मालकीच्या ट्रकमधून चिरे वाहतूकीचा व्यवसाय करत होते. बुधवारी रात्री १०. ३० वाजता फणसगाव येथील दवडे यांच्याकडून ६ इंची साईजचे ५०० चिरे आपल्या मालकीच्या ट्रकने कोल्हापूरकडे घेऊन जात होते. करुळ घाट रस्ता खराब असल्यामुळे ते तरेळे, वैभववाडी मार्गे भुईबावडा घाटातून निघाले.
भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून मागे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर हेळ्याचा टॉप येथील एका अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक थेट २00 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला.
या अपघातात ट्रक क्लीनर असलेला सुदर्शन महाजन बचावला आहे. अपघातानंतर सुदर्शनचे डोळे उघडले तेव्हा सर्वत्र अंधार होता. स्वतः जखमी अवस्थेत तो ट्रकमधून बाहेर आला व ट्रकमध्ये अडकून पडलेल्या वडिलांना बाहेर काढले.
मात्र वडील बेशुद्ध अवस्थेत होते. अपघातात मोबाईल कुठेतरी पडल्याने मदतीसाठी संपर्क करता आला नाही. त्यामुळे काळोखातून खोल दरीतुन झाडे झुडपे यांचा आधार घेत तो कसातरी रस्त्यावर आला.
गगनबावड्याच्या दिशेने तो चालत जात असताना टेम्पोवाल्याला हात दाखवून थांबवले. त्या टेम्पोतून तो गगनबावडा पोलीस स्टेशनला पोहचून तिथून त्याने आपल्या घरी नातेवाईकाना फोन केले.
कळे येथुन नातेवाईक १०८ रुग्णवाहिका घेऊन भुईबावडा घाटात आले. अपघात वैभववाडी तालुक्याच्या हद्दीत असल्यामुळे गगनबावडा पोलिसांनी अपघाताची माहिती सकाळी ५.३० वाजता वैभववाडी पोलिसांना दिली.
अपघाताची माहिती समजताच वैभववाडी पोलीस शैलेश कांबळे, संदिप राठोड घटनास्थळी दाखल झाले. ट्रक खोल दरीत असल्यामुळे करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमला पाचरण करण्यात आले.
या टीमने दरीत उतरून मोठया कष्टाने चालकाला दरीतून बाहेर काढले. कळे येथील १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी चालक सतीश महाजन यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी कणकवली येथून शववाहिनी बोलावून मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून गुरुवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
मयत महाजन हे गेली २० वर्षे चालक म्हूणन काम करत होते. त्यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अपघाती निधनाने घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.