जंगलातून अवचित आलेल्या वाघाने शेतीकामात व्यग्र असलेल्या रंजित मंडल यांच्यावर हल्ला चढविला.

0
65

गडचिरोली : जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष काही थांबायला तयार नाही. मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगरात शेतात धान बांधणीचे काम करण्यात व्यग्र असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविला.

सोबतच्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलात पळून गेला. हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. २ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता ही घटना घडली.

रंजीत कुटीश्वर मंडल (वय ५५,रा.विश्वनाथनगर) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते गुरुवारी स्वत:च्या शेतात धान बांधणीच्या कामाला गेले होते. इतर शेतकरीही आपल्या शेतात धानबांधणीचे काम करत होते.

जंगलालगत त्यांचे शेत आहे. जंगलातून अवचित आलेल्या वाघाने शेतीकामात व्यग्र असलेल्या रंजित मंडल यांच्यावर हल्ला चढविला. ते जिवाच्या आकांताने ओरडल्यावर इतर शेतकरी धावले व आरडाओरड केली, त्यानंतर वाघाच्या तावडीतून रंजित मंडल यांची सुटका झाली.

वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, जखमी मंडल यांना तातडीने मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

महिन्यात दोन महिलांचा बळी

वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यात दोन महिलांचा बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नरभक्षक वाघांना वनविभागाने जेरबंद केले, पण या घटनेने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. धान काढणीच्या हंगामातच वाघांचा उपद्रव सुरु झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here