छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडताना शासनाने काही आश्वासन दिले होते.या शब्दाचे पालन करण्यासाठी काढलेला जीआर घेऊन आज सकाळी सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला थेट रुग्णालयात दाखल झाले.
राज्याचे रोहमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे आणि मुख्यमंत्र्यांचे वैद्यकीय सहाय्यक विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ सकाळी दहा वाजता संभाजी नगरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले.
मनोज जरांगे पाटील तेथे उपचार घेत असल्याने हे शिष्टमंडळ थेट रुग्णालयात आले. यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना तीन नोव्हेंबर रोजी काढलेला जीआर सोपविला.
या जीआरनुसार राज्य सरकार पात्र मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी जात प्रमाणपत्र देणार आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार रक्ताचे नाते आणि नातलग या आरक्षणासाठी पात्र असल्याची जीआरमध्ये नमूद करण्यात आले.
24 डिसेंबर हीच सरकारला मुदत
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण द्यावे यासाठी दोन दिवसापूर्वी उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर ही मुदत दिली आहे, असे असले तरी राज्य सरकार मात्र 2 जानेवारी पर्यंत ही मुदत वाढून मागत आहे. जरांगे पाटील यांनी मात्र मुदत वाढवून देण्यास नकार दिला.