भ्रष्टाचारी लोकसेवकांविरुद्ध वज्रमुठ; नाशिक राज्यात राहिले अव्वल! लाच देणे-घेणे गुन्हा : विश्वास नांगरे पाटील

0
97

नाशिक : देशाच्या सर्वांगीण विकासात अडसर निर्माण करणाऱ्या भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटनासाठी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वज्रमुठ केली आहे. अत्यंत चांगल्यापद्धतीने गुणवत्तापुर्ण सापळा कारवाई भ्रष्ट लोकसेवकांविरूद्ध करण्यास विभागाला यावर्षी यश आले आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकमध्ये बोलताना दिली.

आतापर्यंत राज्यात ७०० तर नाशिक परिक्षेत्रात १४० कारवाया करण्यात आल्या आहेत.

नाशिक राज्यात अव्वलस्थानी राहिले आहे, असेही नांगरे पाटील म्हणाले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागा संपुर्ण राज्यभरात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती दक्षता सप्ताह साजरा करत आहेत.

यानिमित्ताने नांगरे पाटील यांनी नाशिक येथील परिक्षेत्र कार्यालयाला शनिवारी (दि.४) भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दक्षता जनजागृती सप्ताहांतर्गत जनतेचेही प्रबोधन केले जात आहे.

लाच देणे व घेणे या दोन्ही कृती गुन्ह्यांमध्ये समाविष्ट होतात. भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी सगळ्यांनी सोबत येत योगदान द्यावे, कोणत्याही शासकिय कार्यालयात आपल्या हक्काच्या कामासाठी कोणालाही कुठलीही लाच देऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दक्षता सप्ताहच्या औचित्यावर बोलताना नांगरे पाटील म्हणाले, दक्षता तीन प्रकारची असते. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रतिबंधात्मक दक्षता व जागृतीपर दक्षता आहे. राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दोन्ही प्रकारे ‘दक्षता’ घेत आहेत.

राज्यभरात विविध शासकिय कार्यालयांमध्ये भ्रष्ट लोकसेवकांविरूद्ध व त्यांच्या खासगी इसमांवरसुद्धा सापळा कारवाई करुन अटक करण्यात आली आहे. सापळा कारवाईचा सिलसिला सुरूच राहणार आहे; मात्र नागरिकांनीसुद्धा जागरूक होत शासकिय कार्यालयात ‘चहापाणी’ टेबलाखालून देणे टाळायला पाहिजे, असेही नांगरे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here