अजितदादांच्या गटाची काटेवाडीसह ३० ग्रामपंचायतीवर सत्ता; भाजपकडे २ ग्रामपंचायती

0
104

बारामती : संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाने सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. यामध्ये सरपंचपदासह १६ जागांसाठी लढत झाली.आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीच्या मंदाकीनी दादा भिसे या सरपंच पदी निवडुन आल्या आहेत.

त्यांनी भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार ज्योती बापु भिसे आणि शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार कमल बापु भिसे यांचा पराभव केला आहे. तसेच काटेवाडीतील अपक्ष उमेदवार कोमल राहुल ठोंबरे,तर भाजपचे अविनाश कवाळे हेे उमेदवार सदस्यपदी निवडुन आले आहेत.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात बाजी मारली होती. त्यावेळी एक अपक्ष उमेदवार निवडुन आला होता.यंदा मात्र भाजपच्या एका सदस्याने बाजी मारली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपने काटेवाडी ग्रामपंचायतीची लढत प्रतिष्ठेची केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीवर लक्ष ठेवुन होत्या.

अखेर काटेवाडीकरांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत सरपंचपदासह १४ जागांवर विजय मिळविला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.

…पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

काटेवाडीप्रमाणेच चर्चेची ठरलेल्या पारवडी ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने बाजी मारली आहे. याठीकाणी सरपंच पद आणि ९ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. तर ४ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला.

भाजपने भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे आणि राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे नेते, बाजार समितीचे सभापती गावडे यांच्यात नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणुक लढविली.

…चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

बारामती तालुक्यातील चांदगुडे वाडी ग्रामपंचायतीवर सरपंचपदासह ४ जागांवर भाजप नेते दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळविला.यामध्ये ५ जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिंकल्या आहेत.

दंडवाडी ग्रामपंचायत सरपंचपदाबाबत भाजप आणि राष्ट्रवादीचेे परस्पर विरोधी दावे करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दंडवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे उमेदवारांना संपुर्ण गावाने पाठींबा दिला होता.ते संपुर्ण गावाचे पॅनल होते.

कोण्त्याही एका पक्षाचे नव्हते. यामध्ये भाजपचा काही संबंध नसल्याचे सांगितले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पारवडी, चांदगुडेवाडीसह दंडवाडीचे सरंपचपदी भाजपचाच उमेदवार निवडुन आल्याचा दावा केला आहे.

बारामती तालुक्यात एकुण ३२ ग्रामपंचायतींची निवडणुक पार पडली. त्यापैकी मानप्पावस्ती बिनविरोध झाली आहे. त्यामुळे ३० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाने वर्चस्व मिळाल्याचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.

…शरद पवार गट दुरच

बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचा शरद पवार गट ग्रामपंपचायत स्तरावर यंदाच्या निवडणुकीत दुरच असल्याचे दिसुन आले. पवार गटाच्या अजुन पदाधिकारी निवडीच सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी तालुका पातळीवरील पदाधिकारी, तर नुकतीच शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला बारामती शहर आणि तालुक्यात अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागण्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here