कोल्हापूर : उसाएवढे उत्पन्न देणारे व हमीभावाचे इतर पिके सध्या तरी शेतकऱ्यांसमोर नाही. केळी, भाजीपाल्यासह इतर पिकांतून नुकसानच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस पिकांकडेच अधिक आहे.
त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांचा काटा काढण्यासाठी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी तो शेतकऱ्यांच्या पचनी पडणार का? हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ऊस दराचे आंदोलन पेटले असून, मागील हंगामातील चारशे रुपयांसाठी ‘स्वाभिमानी’ने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत कारखानदारांवर आसूड ओढताना उसाच्या लागणी न करण्याचा सल्ला राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. या सल्ल्याची बुधवारी शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्याच्या हवामानावर पीक पद्धती ठरलेली आहे.
बारापैकी दहा तालुक्यात जोरदार पाऊस तर दोन तालुके कमी पावसाचे आहेत. त्यानुसार पिकांची लागवड केली जाते. येथे ४ लाख ४८ हजार हेक्टरपैकी जवळपास ४ लाख हेक्टर खरिपाचे तर २५ हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. यातील सुमारे १ लाख ८६ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो.
दर कमी अधिक झाला तरी त्याची गाळप करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात व एफआरपीप्रमाणे दर मिळण्याची हमी असते. इतर पिकांसाठी बाजारपेठ शोधावी लागते, तिथे अपेक्षित दर मिळेल याची खात्री नाही. त्यात जिल्ह्यात सरासरी १७५० मिली मीटर पाऊस पडतो. अशा परिस्थितीत इतर पिकांतून चांगल्या उत्पन्न मिळत नाही.
शेतकऱ्यांनी यापूर्वी केळी, भाजीपाल्यासह इतर पिके काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यात मोठे नुकसान सोसावे लागल्याने ते शेतकरी पुन्हा उसाकडे वळले आहेत. आता राजू शेट्टी यांनी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी शेतकऱ्यांच्या पचनी पडणार का? हे पहावे लागणार आहे.
नदी बुडीत क्षेत्रात इतर पिके तग धरणार का?
जिल्ह्यातील प्रमुख नद्या व ओढ्याच्या पुराच्या पाण्यात तब्बल ८० हजार हेक्टर पूर बाधित क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रात इतर कोणतेही पीक तग धरणार नाही, त्यामुळेच ऊस पिकाशिवाय येथे दुसरे पीक येऊ शकत नाही.
ऊसच कसा परवडतो…
- दराची हमी, दराला कायदेशीर संरक्षण मिळते.
- प्रतिकूल परिस्थितीत येणारे पीक
- रोगराई, महापुरामुळे नुकसान झाले तरी किमान ५० टक्के उत्पन्नाची हमी
- मार्केट उपलब्ध असल्याने त्यासाठी मार्केटिंगची गरज नाही.
- बाजारात घेऊन जावे लागत नाही, कारखाने थेट शिवारात येऊन उसाची उचल करतात.
भाजीपाल्यासह इतर पिके यासाठी अडचणीची
- बाजारपेठ शोधावी लागते
- व्यापाऱ्यांच्या हातात दर
- अनिश्चित भावामुळे नुकसान
- अतिपावसात कडधान्य, भाजीपाला टिकत नाही.
- रोगराई व श्रम अधिक घेऊन उत्पन्न कमी