छठ पूजेसाठी बिहारला जाण्यासाठी सूरत रेल्वे स्थानकार प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

0
68

गुजरातमधील सूरतरेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीये. गेल्या दोन दिवसांपासून दिवाळी आणि छट पूजेनिमित्त घरी जाणाऱ्यांची मोठी गर्दी स्टेशनवर पाहायला मिळत आहे.

शनिवारीही सूरतरेल्वे स्थानक प्रवाशांनी खचाखच भरलं होतं. अशातच बिहारकडे जाणारी ट्रेन पकडण्यादरम्यान चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या घटनेदरम्यान तीन ते चार लोक बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारादरम्यान, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.

सूरतच्या खासदार आणि केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश या जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या. पोलिस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) सरजो कुमारी यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली.

सकाळी सूरत रेल्वे स्थानकावरून ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली, त्यामुळे एकच गोंधळ झाला आणि काही लोक बेशुद्ध झाले. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होती. ज्यात काही प्रवाशांना अस्वस्थता जाणवत होती आणि चक्कर आली, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रवाशांपैकी एकाला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला आणि प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं रुग्णवाहिकेत रुग्णालयात नेण्यापूर्वी सीपीआर दिलं. अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीची ओळख अंकित वीरेंद्र सिंग अशी केली आहे.

काय म्हणाले गृह राज्यमंत्री
नवसारी येथे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची संख्या अचानक वाढल्यानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेने एका निवेदनात म्हटलं की, सणासुदीच्या काळात गर्दी लक्षात घेता त्यांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत, ज्यात सूरत आणि उधना येथून विशेष गाड्या चालवणं आणि सुरक्षा, तसंच गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी तैनात करण्यासारख्या बाबींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here