दिवाळीचा आनंद वाढला; गेलेले दागिने परत मिळाले

0
69

कोल्हापूर : चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्यामुळे पाच फिर्यादींचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करवीर पोलिसांनी शनिवारी (दि.

११) सात लाख २२ हजार रुपयांचे दागिने फिर्यादींना परत दिले. लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला दागिने परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले.

चोरीला गेलेला मुद्देमाल परत कधी मिळेल की नाही, याची फिर्यादींना चिंता असते. चोरटे सापडल्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत करून तो वेळेत संबंधित फिर्यादीला परत मिळावा, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

करवीर पोलिसांनी चोरट्यांना पकडून पाच गुन्ह्यांचा उलगडा केला. त्यांनी चोरट्यांकडून चोरीतील सात लाख २२ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केला. न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सर्व मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत दिला.

यांची झाली दिवाळी गोड

रोहित शिरीष करांडे यांना ८५ ग्रॅमची सोन्याची लगड परत मिळाली. सुरेश हिरू लांबोरे यांना २५ ग्रॅमची पुतळ्याची माळ परत मिळाली. शालाबाई पंडित शेळके यांचे चेन स्नॅचिंगमधील १२ ग्रॅमचे मंगळसूत्र मिळाले.

मारुती लक्ष्मण पाटील यांना सात ग्रॅमचे झुबे, टॉप आणि बाली मिळाली, तर प्रणीत प्रल्हाद पाटील यांची ३८ हजार रुपयांची रोकड परत मिळाली. चोरीला गेलेले दागिने आणि रोकड परत मिळाल्याने यांची दिवाळी गोड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here