ऊस आंदोलन: कोल्हापुरात स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह तिघांना अटक

0
84

पेठवडगाव: वारणा कारखान्याला ऊस भरून जाणारा ट्रॅक्टर अडवून नुकसान केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली.

कांबळे यांच्यासह संपत दत्तू पवार, हरी गणपती जाधव, सुनील गोविंद सूर्यवंशी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

आंदोलन चिरडण्यासाठी साखर कारखानदार पोलीस बळाचा वापर करत आहेत. कार्यकर्त्यांच्यावर खोट्या तक्रारी करत आहेत. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा वैभव कांबळे यांनी दिला.

मागील वर्षीचे उसाचे चारशे रुपये आणि चालू वर्षीच्या गळीत हंगामाला साडेतीन हजार रुपयाची पहिली उचल द्यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. निर्णय जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही असा सज्जड इशाराही दिला होता.

या पार्श्वभूमीवर मागील वर्षीचे फरक कारखाने तोट्यात असल्याने देण्यास असमर्थ असल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत. साखर कारखानदारांनी साखर कारखाने सुरू करून ऊस तोडी सुरू केल्या होत्या.

याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध करत आंदोलन आक्रमक केले होते. ट्रॅक्टर फोडाफोडीलाही सुरुवात झाली होती. याच दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सावर्डे (ता हातकणंगले) येथून धनाजी शिंदे यांचा ऊस भरून वारणा कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर मध्यरात्री तळसंदेजवळ अज्ञात दहा ते बारा जणांनी अडविला. आंदोलन सुरू असताना ऊस वाहतूक का करतोस असे विचारत चालक अतुल शिवराज आंबटवाड (रा.आलेगाव, ता.कंधार, जि.नांदेड) यांच्याकडून ट्रॅक्टरच्या चाव्या व मोबाईल काढून घेतला.

तसेच दगडफेक करत ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून चालकास मारहाण केली. ट्रॅक्टरचे टायर्स जाळले. याबाबतची फिर्याद चालक आंबटवाड याने पोलिसांत दिली होती. याप्रकरणी अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here