कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये कर्मचारी वेतनवाढ त्रैवार्षिक कराराची बैठक सोमवारी झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी पाच हजार रुपये पगारवाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली.
दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेतनवाढीची घोषणा करण्यात आली.
‘गोकुळ’च्या यशात उत्पादक, ग्राहक यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. वाढती महागाई व त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी वेतनवाढ गरजेची होती.
ही वेतनवाढ ३० जून २०२३ पासून कायम असणाऱ्या १९९४ कर्मचाऱ्यांना लागू होणार असून, वार्षिक ११ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये रक्कम होणार आहे. वेतनवाढ करून संघाने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.
दरम्यान, कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डोंगळे यांच्यासह संचालकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, बाळासाहेब खाडे, संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील, सरचिटणीस संजय दलगेकर, सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पुणेकर, बोर्ड सचिव प्रदीप पाटील, सहायक महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक ए. एन. जोशी, रामकृष्ण पाटील, डॉ. उदय मोगले, दत्तात्रय पाटील, बी. आर. पाटील, बाजीराव राणे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम उपस्थित होते.