Kolhapur: ग्रामपंचायतीच्या अपहारामधील १५ कोटींची वसुली थकली

0
135

कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील अपहाराची सुमारे १५ कोटी रुपयांची वसुली थकली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी आता याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा पातळीवरील विभागप्रमुख, गटविकास अधिकारी आणि तालुका पातळीवरील विभागप्रमुख यांची बैठक झाली. यामध्ये यावर सविस्तर चर्चा झाली.

गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामपंचायतीमधील अपहाराच्या घटना वाढायला लागल्या आहेत. वित्त आयोगाच्या माध्यमातून लहान ग्रामपंचायतींना लाखो तर मोठ्या ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपये मिळू लागल्याने साहजिकच अपहाराची प्रकरणेही वाढीस लागली आहेत.

अशातच पंचायत राज व्यवस्थेमधील चौकशी प्रक्रियाही कालबाह्य झाल्यामुळे ते कायदेच निष्प्रभ ठरले आहेत. त्यामुळेच या अपहारातील वसुलीची रक्कम थकत चालली आहे.

ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये रस्ते, गटर्स, पाणीपुरवठा, वीजबत्ती ही प्रमुख कार्ये येतात. त्यात आता घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनही समाविष्ट झाले आहे.

ग्रामसेवक आणि सरपंच यांचे नाते एकदा का घट्ट झाले की मग तेथे विरोधकसुद्धा काही करू शकत नाहीत, असे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रकरणांवरून दिसून आले आहे.

त्याचमुळे कामे न करता पैसे अदा करणे, कमिशनवर साहित्य घेणे हे प्रकार सर्रास होत राहतात. परंतु अनेक बहाद्दरांनी वसूल झालेला करसुद्धा खिशातच घातलेली उदाहरणे आहेत. त्यामुळेच केंद्र शासनाने नवी ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांमधील २०७ अपहाराची प्रकरणे घडली. त्यामध्ये १८ कोटी ८० लाख ६३ हजार रुपयांचा अपहार झाला होता.

त्यातील केवळ ३ कोटी ६९ लाख ७७ हजार रुपयांची वसुली झाली आहे. परंतु १५ कोटी १० लाख ८६ हजार रुपयांची अजूनही वसुली झालेली नाही.

सर्वाधिक रक्कम हातकणंगलेमध्ये

सर्वाधिक अपहार हा हातकणंगले तालुक्यात झाला असून त्यामुळे तेथील वसुलीही मोठ्या प्रमाणावर थकली आहे. एकट्या हातकणंगले तालुक्यातील ११ कोटी ४४ लाख रुपयांची अपहाराची वसूल रक्कम थकीत आहे.

त्याखालोखाल कागल तालुक्याचा नंबर असून तेथील १ कोटी ४३ लाख रुपयांची वसुली थकली आहे. गडहिंग्लज, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील अपहारातील वसूल रक्कम शून्य आहे.

अपहाराच्या वसुलीची थकीत रक्कम रुपये

हातकणंगले – ११ कोटी ४४ लाख
कागल – १ कोटी ४३ लाख
करवीर – १ कोटी १० लाख
चंदगड – ४४ लाख ७० हजार
आजरा – २१ लाख ५१ हजार
शाहूवाडी – १८ लाख ६३ हजार
शिरोळ – १४ लाख ६ हजार
गगनबावडा – ८ लाख २८ हजार
भुदरगड – ५ लाख ८३ हजार
गडहिंग्लज – ००
पन्हाळा – ००
राधानगरी – ००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here