कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार; शाहू छत्रपती यांच्यासह दोन लाख लोकांची उपस्थिती

0
89

कोल्हापूर : आपल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक आणि ठाम असलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा उद्या, शुक्रवारी दुपारी तीन वाजता येथील ऐतिहासिक दसरा चौकात होणार असून सभेला किमान दोन लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज सकाल मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी व्यक्त केला.

या सभेसाठी शाहू छत्रपती यांची विशेष उपस्थित असणार आहे.

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या नगरीत होणारी ही सभा मराठा आरक्षणाला बळ देणारी तसेच महाराष्ट्रातील आंदोलनाला व्यापक साथ देणारी ठरावी यासाठी जिल्ह्यात प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेची माहिती पत्रकारांना दिली.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळा चौक येथे आगमन होणार असून त्यानंतर त्यांच्या गाड्या धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोलपंप, सीपीआर मार्गे राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळापर्यंत येणार आहे. त्याठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून दसरा चौक सभास्थळी येतील. व्यासपीठावर येताच त्यांच्या भाषणाला सुरवात होईल. तेथे अन्य कोणाची भाषणे होणार नाहीत.

सभेसाठी दसरा चौकात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याखाली सुसज्ज स्टेज व चार बाजूचे रस्ते, तसेच दसरा मैदानावर मराठा समाज बांधवाना बसण्याची सोय करण्यात आली आहे.

सभा सर्वांना नीट ऐकता येईल अशी सभा स्थानापासून एक किलोमीटर परिसरात साऊंड सिस्टीमची व्यवस्था व मोठ्या आठ ठिकाणी स्क्रीनवर सभेचे प्रक्षेपण दाखविले जाणार आहे.

मराठा समाज बांधवांनी भगवे झेंडे, कडक उन्हाळा लक्षात घेता भगवी टोपी, नॅपकिन तसेच पाण्याची बाटली सोबत आणावी सभा पूर्ण झाल्यानंतर आपण मराठा आहोत पण प्रथम सूज्ञ नागरिक आहोत म्हणून सभा स्थळी होणारा कचरा गोळा करून घेऊन जाण्याचा आहे. व परत जाताना कोणताही गोंधळ न करता शांत पणे जाऱ्याचे आहे, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here