हुपरी : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले )येथील चंद्रकांत उर्फ आप्पासो बजरंग जाधव व शिवशांत बाळासाहेब माळी यांच्या घरांमध्ये झालेल्या चोरी प्रकरणांतील चोरीस गेलेले सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हुपरी पोलिसांनी दिपावली पाडवा सणानिमित्त परत त्यांच्या ताब्यात दिले.
तर तिघा चोरट्यांना जेरबंद केले.
प्रेमचंद उर्फ टल्ल्या राहुल कांबळे (वय १९) राजू फैजल काळे (४० रा. दोघेही दावतनगर कबनूर) व रोहन नारायण पवार (२०, रा. लक्ष्मीनगर कबनूर) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक किशोर शिंदे व उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी चोरीस गेलेले सौभाग्य अलंकार परत आम्हाला मिळवून देवुन भाऊबिजेची खरीखुरी ओवाळणी दिल्याची प्रतिक्रिया शुभांगी चंद्रकांत उर्फ आप्पासो जाधव यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत उर्फ आप्पासो बजरंग जाधव व शिवशांत बाळासाहेब माळी यांच्या घरांमध्ये दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. जाधव यांच्या घरांतील ४ लाख ६२ हजार ५०० रूपये व शिवशांत बाळासाो माळी यांच्या घरांतील २ लाख ६८ हजार ५९९ असे मिळून ७ लाख ३१ हजार रूपये किमतीचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते.
पोलिस निरीक्षक किशोर शिंदे व उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून या प्रकरणी प्रेमचंद उर्फ टल्ल्या राहुल कांबळे, राजू फैजल काळे व रोहन नारायण पवार या चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला होता.
चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले हे सोन्याचे गंठण, लक्ष्मी हार, नेकलेस,चेन असे सर्व दागिने वरिष्ठांच्या परवानगीने परत तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले.