कोल्हापूर : दिवाळीला एस.टी.च्या कोल्हापूर विभागाने कोल्हापूरातून पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, धाराशीव,कोकणसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांकरीता ९ नोव्हेंबरपासून विशेष बस फेऱ्यांची सोय केली आहे.
या अंतर्गत बुधवारी (दि.१५) पर्यंत या विभागाने १८ लाख ६२ हजार किलोमीटरचे अंतर पार करीत ६ कोटी ७१ लाखांचे उत्पन्न मिळवले.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य राज्य परिवहन मार्ग महामंडळ अर्थात एस.टी.महामंडळाचे चालक, वाहक खऱोखरच सार्थ ठरवित आहेत. कोरोना कालावधीनंतर कर्मचारी पगार, निधी, बसची दुरुस्ती देखभाल आदीच्या खर्चामुळे शासन बंद करते की काय असा प्रश्न उभा राहीला होता. या दरम्यान अनेक उपाययोजना सुरु करण्यात आल्या. मात्र, सरकारला दरमहा पगारासाठी कोट्यवधी रुपये पगारासाठी महामंडळाला द्यावे लागत होते.
सहा महिन्यांपुर्वी राज्य शासनाने खास महिलांकरीता तिकीट दरात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्यानंतर एस.टी.च्या बसेस अगदी हाऊसफुल्ल अशा ओसांडून वाहू लागल्या आहेत.
यात ६५ वर्षावरील ज्येष्ठांनाही अशीच सवलत आहे. यासह ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना पुर्णपणे ही सेवाच मोफत करण्यात आली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून दिवसेंदिवस महामंडळाचे उत्पन्न वाढू लागले आहे. कोल्हापूर विभागाचा विचार करता ९ ते १५ नोव्हेंबर पर्यंत ६ कोटी ७१ लाख रूपयांचे उत्पन्न या विभागाने मिळवले आहे. हा ओघ अजूनही सुरुच आहे.
दिवाळी सुट्ट्याच्या कालावधीत प्रवाशांना सातत्याने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विभागाला ६ कोटी ७१ लाखांचे उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे. – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एस.टी.महामंडळ, कोल्हापूर