देशात नसलेला नियम कोल्हापुरात लावून अडवणूक का करता?, ऊस दरावरुन मंत्री हसन मुश्रीफांचा राजू शेट्टींना सवाल

0
110

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर दिला आहे. कायद्याचे तंतोतंत पालन येथील कारखाने करीत असताना देशात नाही तो नियम कोल्हापुरात लावून शिक्षा का देता?

असा सवाल करीत कर्नाटकातील एका कारखान्याने दीड-दोन लाख टनाचे गाळप केले आहे. त्या कारखान्यांना जिल्ह्यातील ऊस जाऊ देता, मग आमचीच आडवणूक का करता? असा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना केला.



ऊस दराच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी आहे. जेमतेम तीन महिने कारखाने चालतील कामगारांना नऊ महिन्यांचा बसून पगार द्यावा लागणार आहे.

ऊसतोड मजूर बसून आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने ते परत जाऊ लागले आहेत. ही परिस्थती कारखानदारांनी कळकळून सांगितली; पण संघटना ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कर्नाटकातील हलसिद्धनाथ, बेडकीहाळ, उगार, अथणी या कारखान्यांनी दीड-दोन लाख टनाचे गाळप केले आहे.

मागील हंगामाबाबत दराबाबत काही तफावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली असून २१ नोव्हेंबरपर्यंत ते अहवाल सादर करतील. यामध्ये ज्या कारखान्यांना पैसे देय लागले तर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

बेकायदेशीर केले नसताना कोण थांबणार?

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार का? यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील हजारो टन ऊस कर्नाटकात जात आहे. त्यात कायद्यानुसार शेतकऱ्यांना दर दिला आहे. बेकायदेशीर काहीच केले नसताना मग त्यांनी करायचे काय?

अशी आहे समिती..

अध्यक्ष : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
सदस्य सचिव : प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे
सदस्य : पाच शेतकरी संघटना व पाच साखर कारखानदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here