जालना : राज्यभरात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी, भाजप आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले. ओबीसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असे उद्गार गोपीचंद पडळकर यांनी काढले.
तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू कोण? असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांनी निशाणा साधला आहे. अंबड येथे आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते.
वाघाचे बछडे आज एकत्र आलेत. ओबीसींची ही सभा पाहून ओबीसीच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. अनेक जातीत विभागलेले वाघाचे बछडे एकत्र आलेत.
महाराष्ट्रातील ओबीसीचा ढाण्या वाघ म्हणजे भुजबळ साहेब आहेत. त्यांनी भटक्या जमातींना ऊर्जा देण्याचं काम केलं. वाघ म्हातारा झाला म्हणजे तो डरकाळी फोडायचा राहत नाही. सिंह म्हातारा झाल्यावर गवत खात नाही, या अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळ यांचे कौतुक केले.
याचबरोबर, देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु ओबीसीमधील ३४६ जातींचे आरक्षणाला हात लावता काम नये. ओबीसींना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल. प्रस्थापितांना उत्तर देऊ.
महाराष्ट्र समाजाची वातहात कोणी केली? ओबीसी तुमचा शत्रू नाही, तुमचा शत्रू ओळखा. 2014 साली मराठा समाजाला जसे फडणवीस यांनी आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला द्या,असे स्पष्टपणे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.