कोल्हापूर : मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या रविवारी सकाळी 11 वाजता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
ते म्हणाले की, १३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली.
तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या.
तरीही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. मी स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, आदी ठिकाणी रास्ता रोको होणार आहे.
सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन होणार आहे. राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना कोणतास रस दिसत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत.
कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. साखर कारखाने बंद ठेवू अशी भिती आम्हाला कारखानदारांनी दाखवू नये. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत ऊस तोडी आम्ही सुरू करू देणार नाही.
तसेच आजच्या चक्का जाम आंदोलनात मध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, साखर कारखान्यांनी साखरेच्या गाड्या देखील बाहेर पाठवू नये. चक्काजाम आंदोलनाने सरकार व साखर कारखानदारांना जाग आली नाही तर यानंतर होणारा आंदोलनाचा टप्पा अधिक उग्र होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.