प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रविवारच्या अंतिम सामन्यादरम्यान जगातील सर्वांत मोठं स्टेडियम असणाऱ्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कोल्हापूरचे तरुण ६० वॅट क्षमतेचे ४० लेझर मैदानावर लावून आख्ख्या जगाला ‘लेझर शो’ व लाइट इफेक्टचा झगमगाट दाखविणार आहेत.
यापूर्वी कधीही एका वेळेला मैदानावर ४० लेझर कार्यान्वित झालेले नसल्यामुळे हा एक विक्रमच ते रचणार आहेत. या ‘लेझर शो’साठी योगेश चौधरी, अमित पाटील, रामकृष्ण वागराळे, सागर पाटील, अभिषेक हांडे, रोहित कदम, उदय साळोखे, विनोद हाजुराणी, रविकुमार, गणेश तटकरे यांची टीम तैनात आहे.
प्रेक्षकांसाठी पर्वणी
डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई डिम शो आणि ग्राफिक शो यामुळे क्रिकेटचे मैदान विविध रंगांच्या विजेच्या दिव्यांनी झगमगणार आहे. सामना पाहताना ही रोषणाई देखील प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण राहणार आहे. दिल्लीतील ‘हेड वे क्रिएशन’ या कंपनीसोबत कोल्हापुरातील तरुण हा शो सादर करणार आहेत.
आव्हाने स्वीकारत वाटचाल
लेझर शोच्या व्यवसायात २०११ मध्ये पडलेल्या या तरुणांनी आव्हाने स्वीकारत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी अयोध्या इथे दिवाळीसाठी राम मंदिर परिसरात, तसेच उज्जैन येथील महाकाल मंदिरात खास लेझर शो केला होता. याशिवाय दुबई येथील एका लग्नसमारंभामध्ये त्यांनी ६० लेझर लावले होते.