दहा वर्षांनी कोल्हापूरला पुरुषोत्तम करंडक, कॉमर्स कॉलेज विजेता

0
59

कोल्हापूर : पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे सांघिक विजेतेपद शनिवारी कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‘असणं नसणं’ या एकांकिकेने पटकावले.

तब्बल दहा वर्षांनी हा फिरता करंडक कोल्हापूरला मिळाला आहे.
तीन दिवस येथील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सुरु असलेल्या या स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, राजेंद्र पित्रे, उमा नामजोशी, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, अनंत निघोजकर, राजन ठाकूर देसाई, शंकर उणेचा, परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी, प्रताप सोनाळे, मिलिंद दांडेकर उपस्थित होते.


शनिवारी संगीत व नाट्यशास्त्र विभागाने ‘कारण’, साताराच्या महालक्ष्मी कॉलेज ऑफ फिजिआथेरपीने ‘शो.शि.त.'(शोधला शिवाजी तर…), इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने ‘नाव’ आणि भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘हसण्यास कारण की’ या एकांकिका सादर केल्या.

निकाल पुढीलप्रमाणे :
अभिनय नैपुण्य : पियुष जामदार (कॉमर्स कॉलेज), वाचिक अभिनय : दृप्ता कुलकर्णी (तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ), अभिनेता : समर्थ तपकिरे (डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय) : अभिनेत्री : सानिका बडवे (काॅमर्स कॉलेज), विद्यार्थी लेखक : भारतजीवन प्रभूखोत (निर्झर), दिग्दर्शक : अभिषेक हिरेमठस्वामी (असणं नसणं), उत्तेजनार्थ : धम्ममेघा कांबळे (इस्लामपूर), प्रकाश कोळी (इचलकरंजी), श्रेया दुधगांवकर, ऋतुराज कुलकर्णी आणि खदिजा मुल्ला (कोल्हापूर).

चार एकांकिका महाअंतिम फेरीत

सांघिक विजेत्या कॉमर्स कॉलेजसह प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीस मिळणाऱ्या शहाजी लॉ कॉलेजची ‘जंगल जंगल बटा चला है’, देउरच्या प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाची द्वितिय क्रमांकाची ‘पाहिजे म्हणजे पाहिजे’ आणि तृतीय क्रमांकाची महावीर कॉलेजची ‘निर्झर’ एकांकिका पुण्यात २६ ते २९ डिसेंबरअखेर होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी कोल्हापूर केंद्रातून निवडली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here