मागील दोन दिवसात शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे गावा जवळील पिशवी या गावातून घुंगुर कडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना आढळला आहे.
पिशवी खोतवाडी या दोन गावाच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाझुडपात असलेला बिबट्या स्पष्ट दिसत आहे. रात्रीच्या वेळेस जाणाऱ्या वाहनधारकांना हा बिबट्या दिसला.
एका कार मधील प्रवाशाने या बिबट्याचे चित्रीकरण केले आहे. आधी अस्पष्ट दिसणारा बिबट्या कार जवळ गेल्यानंतर मोबाईल कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे.
बांबवडे ते घुंगुर या रस्त्यावर दिवसभर ते रात्री नऊ पर्यंत वाहनांची वर्दळ असते. बांबवडे ते मलकापूर बाजारपेठेकडे कामानिमित्त येणारे लोक सायंकाळी आपापल्या गावी परतत असतात. या मार्गावर दू चाकी स्वारांची मोठी वर्दळ असते , अशातच या बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
शाहूवाडी तालुक्यामध्ये सध्या अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होताना आढळत आहे , मागील महिन्यात आंबा परिसरात बिबट्याचे दर्शन झालेले होते , आणि आता सध्या वरदळीच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे या तालुक्यात अनेक बिबटे वावरत असावेत असे नागरिकातून बोलले जात आहे.