प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
काल झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा उपस्थित होते.
दरम्यान, अंतिम सामन्यातील अनपेक्षित पराभवानंतर नरेंद्र मोदींनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जात खेळाडूंची भेट घेतली. तसेच त्यांना धीर दिला. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने सोशल मीडियावर पोस्ट करत नरेंद्र मोदींनी भारतीय संघाला दिलेल्या भेटीची माहिती दिली.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये जडेजा म्हणाला की, आम्ही या स्पर्धेत चांगला खेल केला. पण विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. या पराभवामुळे अनेकांची हृदय दुखावली गेली.
पण आमच्या चाहत्यांकडून मिळणारा पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास बळ देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ड्रेसिंग रूममध्ये येत दिलेली भेट खास आणि प्रेरणादायी होती.
काल झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर भारताची फलंदाजी निराशाजनक झाली होती.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही. त्यामुळे भारताला ५० षटकांमध्ये केवळ २४० धावाच करता आल्या.
तर ट्रॅव्हिस हेडने ठोकलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहा विकेट्सने सहज जिंकून सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला.