मलकापूर प्रतिनिधी –
शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर वारुण पैकी तळीचावाडा येथील सारिका बबन गावडे हिचा आज बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
सारिका आपल्या चुलतीसोबत घराशेजारीच शेळी चारण्यासाठी गेली आता घरापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारीका वर हल्ला केला.तिच्या मानेवर ,डोक्यावर खोलवर जखमा केल्या.
चुलतीने आरडाओरडा केल्यावर बिबट्या निघून गेला परंतु तोवर खूप वेळ झाला होता.त्यातच जागेवर तिचा दुर्दैवी मृत्यु झाला.असून सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वनविभाग मलकापूर येथे झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या या डोंगरालागत असणाऱ्या उदगिरी, राघूवाडा,ढवळेवाडी, तळीचावाडा विठ्ठलाईवाडी,केदारलिंगवाडी,शित्तुर वारुण,उखळू या भागात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आतापर्यंत केदारलिंगवाडी येथील शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू,उखळू येथील शाळकरी मुलावर हल्ला, कदमवाडी येथे एकावर प्राणघातक हल्ला,२० पेक्षा जास्त गायी म्हैसी,५० शेळ्या तितकेच कुत्री बिबट्याने ठार केली आहेत .
वनविभागाने याकडे गंभीरपणे लक्ष देणेची गरज आहे.वनविभागावर ग्रामस्थ कमालीचा रोष व्यक्त करत आहेत.बिबटया व अन्य प्राण्यांचा उपद्रवाने लोक हैराण झाले आहेत.या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वनविभागाचे अधिकारी भोसले, वाडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.शक्य तितकी अधिक मदत देणेचे आश्वासन दिले.