कोल्हापूर : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर ते लगेचच पुन्हा मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही याला दुजोरा दिला आहे.
गेल्याच महिन्यात याच पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे हे येथील कणेरी मठावर आले होते. या ठिकाणी दोन औपचारिक छोटे कार्यक्रम करून रात्री साडेतीन वाजता ते मुंबईला रवाना झाले होते.
आज सकाळपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची कोणतीही कल्पना नव्हती. परंतु दुपारनंतर त्यांचा हा दौरा आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दौऱ्याच्या तयारीला सुरुवात केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ही दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन यासह पोलिस विभागही सतर्क झाला आहे. राज्यभर सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन आणि कोल्हापूर जिल्ह्यात पेटलेले ऊस दराचे आंदोलन यामुळे तर अधिक दक्षता घेतली जात आहे.