कुपवाड : उसाचा दुसरा हप्ता प्रती टन चारशे रुपये देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी कुपवाड शहर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या बैल गाड्यांच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांनी वाहतूक रोखली होती.
दरम्यान शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
शहरातील कुपवाड कवलापूर रस्त्यावरील अक्षय हाॅटेल चौकात रेवाण्णा मळ्यातून वसंतदादा साखर कारखान्याला चाललेली उसाची वाहतूक रोखण्यात आली.
तसेच संत रोहिदास चौकात सावळीतून येणारी वाहतूक संघटनेच्या वतीने रोखण्यात आली. यावेळी बैलगाडीची हवा सोडून ऊस दराची कोंडी फुटत नाही.
तोपर्यंत शेतकरी बांधवांनी उसाची तोड व वाहतूक करू नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष मगदूम व कुपवाड अध्यक्ष गौंडाजे यानी केले आहे. यावेळी संघटनेच्या वतीने निदर्शनेही करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष गोपाळ मगदूम, शहर अध्यक्ष प्रमोद गौंडाजे, कुपवाड विकास सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, युवा नेते सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी चेतन आवटी, बाहुबली पाटील, सचिन रेवाणा, अनिल पाटील, विजय रेवाणा, गौतम रेवाणा, अभिषेक गौंडाजे, राहुल खोत आदी उपस्थित होते.