कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त कल्याण घेटे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत होते. बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळाली की, शुक्रवारी नाशिकच्या शिर्डी पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी अजिंक्य मोरे यांच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक नाशिकच्या दिशेने रवाना झाले. बाजारपेठ पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेतले.
पार नाका परिसरातील दर्शन याने अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्याच्या बदल्यात ८० टक्के व्याज देतो, असे सांगितले. अनेक लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. मात्र, त्यांना मूळ रक्कम आणि व्याज न मिळाल्याने त्याला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, शेअर बाजारात गुंतविलेले पैसे बुडाले. मी पैसे कुठून देऊ. हे ऐकताच गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. लोकांनी त्यांच्या जीवनभराची पुंजी दर्शनकडे दिली होती. यामुळे बाजारपेठ पोलिस ठाण्यात दर्शनविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला व ते कळताच दर्शन हा पसार झाला.
कल्याण : कल्याणमध्ये अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा दर्शन परांजपे याला शिर्डी येथून कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे एक पथक नाशिकहून परांजपेला घेऊन कल्याणच्या दिशेने निघाले.
दर्शन परांजपे याने आतापर्यंत अनेकांची ९ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.