जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना बालस्नेही पुरस्कार; मुंबईत आज वितरण

0
60

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा २०२२-२३ चा बालस्नेही पुरस्कार पुणे विभागातून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना मंगळवारी जाहीर झाला.

आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी त्याची घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण आज बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.

जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह तत्कालीन जिल्हा व महिला बालविकास अधिकारी शिल्पा पाटील आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांचाही यावेळी याच पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा होत आहे.

बाल विकास क्षेत्रात जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी,कर्मचारी, संस्था यांना चांगल्या कामाचे प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रथमच बालस्नेही पुरस्कार देण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याने या वर्षात या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. प्रियदर्शनी पॉलीसॅक्स व महालक्ष्मी पॅकिंग येथून १२३ बाल कामगारांना मुक्त करण्यात आले.

त्यापैकी ५९ बालके अल्पवयीन बालकामगार असल्याने ती पश्चिम बंगालमधील महिला बाल विकास विभागाशी संपर्क करुन त्यांना त्यांचे मुळ कुटूंबात परत पाठविण्यात आली.

त्यासाठी महिला बाल विकास, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अवनी संस्था आणि पोलीसांच्या समन्वयातून ही मोहिम यशस्वीपणे राबवली. बिहारमघून मदरसामध्ये दाखल होण्यासाठी आलेल्या ६९ बालकांनाही त्या राज्याशी संपर्क करुन त्यांच्या कुटूंबात परत पाठविण्यात आले.

बालसंगोपन योजनेचा लाभ साडेतीन हजारांपेक्षा जास्त बालकांना देण्यात आला. कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंद्यांच्या ३६ मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. एक टक्का आरक्षणाचा लाभ मिळावा याकरीता जिल्ह्यातील ५५ बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळवून दिले. कोव्हीड काळात आई-वडील गमावलेल्या १४ पूर्ण अनाथ व एक हजार ४१ एक पालक अनाथ बालकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here