महापालिकेतील विद्यार्थ्यांनी ‘काय खायचे, काय नको’ हे आता आहार तज्ज्ञ सांगणार आहेत. तसेच आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी आहाराबाबत प्रश्नमंजुषादेखील होणार आहे.
शिक्षण विभागाने ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम हाती घेतला आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी पालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एसएसएसएआय) व इंडियन पेडट्रिशिअन असोसिएशन (आयपीए) यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ८ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांना आहार तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिराचे उद्घाटन
२३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात यासंदर्भातील शिबिराचे उद्घाटन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पुढील सहा दिवस पालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना आहाराबाबतचे तज्ज्ञांद्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याठिकाणी प्रशिक्षण सत्र
२४ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या ए, बी, सी, डी आणि इ विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी जगन्नाथ शंकरशेठ शाळेत, २८ नोव्हेंबर रोजी ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ विभागातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी भवानी शंकर रोड पालिका शाळेत प्रशिक्षण सत्र होईल.
तसेच ३० नोव्हेंबर रोजी ‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एल. के. वाघजी केंब्रिज पालिका शाळेतदेखील आहारतज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.
यांना मिळणार प्रशिक्षण
महापालिकेतील सुमारे ६०० विद्यार्थी व ५० शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच बृहन्मुंबई पालिका क्षेत्रातील इतर सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना या कार्यक्रमाचा यूट्यूब लिंकद्वारे ऑनलाईन माध्यमातून तर ४५० शालेय इमारतींमधील ११५० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तसेच डिजिटल क्लासरुमच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाचा लाभ होणार आहे.